चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

वाजंत्रीसह प्रचाराने नागरीकांचे लक्ष वेधले

Source: Tarun Bharat Solapur      Date: 05 Oct 2014 03:03:12


परभणी, (प्रतिनिधी)- वाजंत्रीचा आवाज घरासमोर आल्याबरोबर घरातील महिला धाऊन बाहेर येतात आणि पाहतात तो काय? एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी प्रचारासाठी आलेल्या. विशीष्ट उमेदवारालाच मतदान करावे असे सांगून महिला पदाधिकारी पुढे निघून जातात. असे चित्र परभणी शहरात पहावयास मिळत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रचारात गतिमानता आली. एका बाजूला आधुनिक पद्धतीने सोशल मिडीयाद्वारे प्रचार यंत्रणा राबवित असतांना जुन्या काळातील वाजंत्रीचा वापरही आता प्रचारासाठी होतांना दिसून येत आहे. शहरातील वसमत रोड भागात शनिवारी सकाळी वाजंत्री वाजत महिलांचे पथक निघाले. वाजंत्री कशाची आहे म्हणुन सर्वचजण उत्सूकतेने पाहत होते. तो मागे एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी नागरीक व महिलांना हात जोडून मतदान करण्यासाठी विनंती करीत होत्या. हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरु असलेला प्रचार नागरीकांचे लक्ष वेधून घेतांना दिसून येत आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आज कितीही यंत्रणा राबत असल्या तरी घराजवळ वाजंत्रीचा आवाज येताच महिला उत्सूकतेपोटी घराबाहेर येतात. आणि काय आहे? हे पाहिल्या शिवाय त्यांना समाधान होत नाही. गेल्या अनेक वर्षापासुनची ही परंपरा आजही कायम असुन वाजणारी वाजंत्री आणि महिलांचे प्रत्यक्ष येऊन पाहणे हे सुत्र एका राजकीय पक्षाच्या नेत्याने हेरले. आणि त्याचा अवलंब आज प्रचारात होतांन दिसून येतो. वाजंत्री वाजवित ही पदयात्रा पुढे सुरु असली तरी घरासमोर गेल्यानंतर पदाधिकारी घरातून आलेल्या महिलांसमवेत चर्चा होईपर्यंत मात्र वाजंत्रीवाळे थांबतात आणि त्या घरातुन पदाधिकारी बाहेर पडताच पुन्हा वाजंत्री सुरु होते. एका विशीष्ट लयबद्ध पद्धतीने सुरु असलेली ही प्रचार यंत्रणा परभणी शहरात सध्या चर्चेचा विषय झाला आहे. पुरुष उमेदवार असले तरी प्रचारात त्यांच्या सौभाग्यवतींसह अनेक महिला सहभागी असतात. महिलांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली जाते. शांत आणि थंड प्रचार होण्यापेक्षा एक वेगळेपणे जोपासावे आणि त्यातुन नागरीकांच्या कानावर मांगल्याचे सुर जावेत, या व्यापक दृष्टीकोनातून ही प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे दिसून येते. यामुळे शहरातील विविध भागात कोणतेही कार्य नसतांना वाजंत्रीचे सुर सर्वत्र उमटतांना दिसून येतात. यात आश्‍चर्यासोबतच वेगळेपण जोपासण्याचा प्रयत्न त्या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराकडून होतांना दिसून येत आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.