चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

मुंडेच्या स्वप्नपूर्तींसाठी गुट्टेंना विजयी करा : पंकजा

Source: Tarun Bharat Solapur      Date: 03 Oct 2014 08:31:31

गंगाखेड, (प्रतिनिधी)- राज्यातील सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणुन सत्ता आणण्याचे कै.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी गंगाखेड मतदार संघातून रासपा-भाजपा घटक पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन भाजयुमोच्या अध्यक्षा आ.पंकजाताई मुंडे यांनी केले. भाजपा-रासप घटक पक्षाचे उमदेवार रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी गंगाखेड येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, रामप्रभू मुंडे, अभय चाटे, श्रीराम मुंडे, राजाभाऊ फड, व्यंकटराव तांदळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, परळी मतदार संघातून मी उभी असली तरी परळी एवढाच जिव्हाळा गंगाखेड मतदार संघाशी आहे. निर्माण झालेला हा जिव्हाळा जोपासण्याचे कार्य मतदारांना करायचे असुन यासाठीच विनंती करावयास आले. गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारने भ्रष्टाचार, घोटाळे केले. त्यातून शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या त्रस्त झालेल्या शेतकरी,शेतमजुरांना न्याय देण्यासाठी राज्यात सामान्य माणसाचे राज्य येणे आवश्यक आहे. गरीब माता-भगिणींच्या हाताला काम द्यायचे. बेरोजगार तरुणांना रोजगारी मिळवून द्यायची. हे मुंडे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व दुःख बाजुला सारून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या निमीत्ताने गंगाखेड येथे जाहीर सभा झाली. यावेळेस उमेदवार कोण असेल? याची माहिती नव्हती. जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे यांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र घटक पक्षामध्ये हा मतदार संघ रासपला गेला. रबदडे यांनी प्रचंड इच्छा असतांनाही एका शब्दावर उमेदवारी मागे घेतली. यामुळे गुट्टे यांनी या मतदार संघातून विजयी होण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.मधुसूनद केंद्रे यांचे नाव न घेता, पंकजा म्हणाल्या, जे कधी मुंडे साहेबांचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे काय होतील? याची जाणीव ठेवून त्या सर्व बाबी विसरा. रासपचे अध्यक्ष महादेवजी जानकर हे आपल्यासोबत आहेत. त्यामुळे या मतदार संघात सर्व शक्ती एकवठली असुन अनेकजण तरुणांच्या हातात बाटली आणि पैसे देतील,हे नाकारून आयुष्यात सामान्य माणसाला काय मिळणार आहे? याचा विचार करून गुट्टे यांना मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपा व घटक पक्षाचे सरकार आल्यास केंद्रातील विविध योजना परळी प्रमाणेच गंगाखेड मतदार संघात राबविण्यात येतील. या मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी आपण स्वतः घेत असुन नागरीकांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये. येत्या १५ ऑ्नटोंबर रोजी कपबशीचे बटन दाबुन रत्नाकर गुट्टे यांना विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, भाजपासोबत असलेले संबंध आजही कायम असुन भाजपाने अत्यंत मोठ्या मनाने गंगाखडेची जागा दिली. विकासशिल दृष्टी असलेले रत्नाकर गुट्टे हे उमेदवार असुन त्यांच्यामार्फत या मतदार संघाचा आमदार होण्यापूर्वीच विकास झालेला आहे. उर्वरित विकासासाठी त्यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, रामप्रभू मुंडे यांचीही समयोचित भाषणे झाली. सभेस भाजपा,रासप व घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.