चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

हिंगोलीत पाच मतदान केंद्रावर होणार थेट प्रक्षेपण

Source: Tarun Bharat Solapur      Date: 15 Oct 2014 03:19:42

हिंगोली, (जि.प्र.)-हिंगोली मतदारसंघातील संवेदनशील पाच मतदान केंद्रांवर मतदानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सोमवारी दि.१३ ऑक्टोबर रोजी दिली.येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार कडवकर, सेनगावचे तहसीलदार मेंडके यांची उपस्थिती होती.कडवकर यांनी सांगितले, की हिंगोली मतदारसंघाअंतर्गत एकूण ३२३ मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी २ लाख ८६ हजार ५३१ मतदार मतदान करतील. यामध्ये हिंगोली शहरातील डॉ. इक्बाल उर्दू स्कूल, संभाजी विद्यामंदिर, गोरेगाव, सेनगाव व नांदुरा येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र संवेदनशील आहे. या ठिकाणी होणार्‍या मतदानाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.दरम्यान, मतदारांना मतदान स्लीप मिळाली नसल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्राबाहेर थांबून स्लीप वाटप करणार आहेत. या मतदारसंघात एकूण २ हजार १४८ सर्व्हिस मतदारांना टपालाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५७२ मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.मतदारसंघात आज सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचारार्थ लावलेले बोर्ड, बॅनर्स, कटआऊट्‌‌स, ध्वज तातडीने काढून घ्यावेत. प्रचारासंबंधीचे बॅनर्स व इतर साहित्य आढळून आल्यास संबंधितांवर अचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.मतदानाच्या दिवशी बुधवारी दि.१५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरापर्यंत कोणीही प्रचार कार्यालय सुरू करू नये, शंभर मीटरच्या आत उमेदवारांना वाहने आणता येणार नाहीत. मतदारांशी चर्चाही करता येणार नाही किंवा त्यांना नमस्कारदेखील करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.