चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Source: Tarun Bharat Solapur      Date: 15 Oct 2014 03:35:33

परभणी, (प्रतिनिधी)- उद्या, दि.१५ ऑक्टोंबर रोजी होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील चारही मतदार संघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन प्रत्येक केंद्रावर ईव्हीएम मशीन पाठविण्यात आल्या आहेत. तसेच या मतदान केंद्रावर अतिरीक्त ईव्हीएम मशीन सुद्धा पाठविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारपर्यंत ९६ टक्के पोलचिट वाटपाचे काम पूर्ण झाले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत उर्वरित पोलचिट वाटपाचेही काम पूर्ण करण्यात आले. तसेच मतदान करण्यासाठी पुढील बाबी मतदार ओळखपत्र म्हणुन ग्राह्य धरण्यात येतील. त्यात पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांना देण्यात आलेले ओळखपत्र, बँक, पोस्ट कार्यालयातील फोटोसह असलेले पासबुक, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, विमा स्मार्ट कार्ड, सेवानिवृत्तीचे फोटोसह निर्गमित केलेले कागदपत्र आदींचा समावेश आहे. तसेच ओळखपत्रावर काही लेखनीक चुका असल्या तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील चार मतदार संघात ६९ मतदान केंद्र अतिसंवेदनशील असुन त्यात जिंतूर २२, परभणी २०, गंगाखेड १२ आणि पाथरी मतदार संघात १५ मतदान केंद्राचा समावेश आहे. या अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरीक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्यासह कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जिंतूर १३१२, परभणी १९९८, गंगाखेड १५८४, पाथरी ८७४ असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. उद्या होणार्‍या मतदानासाठी जिल्ह्यात १३०८११७२ मतदार असुन त्यात पुरुष ६८२२९८ तर स्त्री ६२५८७१ मतदार आहेत. यात जिंतुर ३ लाख २४०१२, परभणी २८५८६४, गंगाखेड ३६४७७०, पाथरी ३३३५२६ मतदार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वत्र व्हिडीओग्राफर तसेच पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन तेथे फिरते पथकही नियुक्त करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधाचा गरज पडल्यास ही सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली असुन गाव पातळीवरील आशाताईंचा यात सहभाग राहणार आहे. प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती मोहिम सर्वत्र राबविण्यात आली असुन जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. जाहीर प्रचार संपला असल्यामुळे प्रत्येक उमेदवारांना जास्तीत जास्त तीन वाहने वापरता येतील. मात्र मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेणे-आणण्यासाठी वाहन वापरता येणार नाही. याचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. चारही मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले ऑब्झरर्व्हर या सर्व बाबींवर लक्ष ठेवून राहणार असल्याचे कळविले आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.