चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

परभणी मतदार संघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष

Source: Tarun Bharat Solapur      Date: 15 Oct 2014 03:38:23

परभणी, (प्रतिनिधी)- परभणी विधानसभा मतदार संघात २५ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी या बहुरंगी लढतीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. कोण किती मते मिळवितो? त्यापेक्षा मताची विभागणी कशी होते? यावरच विजयाचे एकंदर गणित असल्याचे चित्र अंतिम टप्प्यात पहावयास मिळाले. परभणी मतदार संघातून शिवसेनेचे डॉ.राहूल पाटील, भाजपाचे आनंद भरोसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रताप देशमुख, बसपाचे डी.एस.कदम, एमआयएमचे सज्जुलाला, कॉंग्रेसच्यावतीने इरफानुर रहेमान खान यांच्यासह २५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्यामुळे वातावरण ढवळून निघाले. सर्व पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले असुन गाव पातळीवर कार्यकर्त्यांना आपापले गाव सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान करून घेण्यावर भर देण्यात आला असुन यासाठी युवकांची फळी तैनात करण्यात आल्याचे दिसून येते. परभणी मतदार संघात आजपर्यंत झालेल्या अनेक निवडणुका लक्षात घेता, गेल्या पंचवीस वर्षापासुन या मतदार संघावर शिवसेनेचे प्राबल्य आहे. परंतु भाजपा व शिवसेना युती कायम होती. यामुळे बहुतांश वेळेस पक्षापेक्षा दोन धर्मात निवडणूक होत होती. मात्र यावेळेस आघाडी आणि युती तुटल्यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाने सक्षम असे आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली असल्यामुळे एक चांगले आव्हान असल्याचे मानण्यात येते. भरोेसे यांचा व्यक्तीगत संपर्क दांडगा असुन या सोबत भाजपाचे कार्यकर्तेही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवसेनेच्यावतीने सर्व कार्यकर्ते सहभागी झाले असुन शिवसैनिक हीच मोठी शक्ती असल्याचे मानण्यात येते. राहूल पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार यंत्रणा गतिमान ठेवली. बसपाच्यावतीने दत्तात्रय कदम हे प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वतःचा व्यापक जनसंपर्क आणि बसपाची उमेदवारी ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. विद्यमान उपमहापौर सज्जुलाला हे एमआय एमच्या तिकीटावर निवडणूक लढवित असुन त्यांचाही दांडगा जनसंपर्क आहे. कॉंग्रेसचे उमेदवार इरफानुर रहेमान खान हे एक सुसंस्कृत कुटूंबातील असुन त्यांचा परिवार कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली. या सर्व परिस्थीतीत मतदार काय निर्णय घेतो? आणि मताची विभागणी कसे होते यालाच महत्व राहणार आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.