चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

पाथरी मतदारसंघात बहुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

Source: Tarun Bharat Solapur      Date: 14 Oct 2014 02:21:40

पाथरी, (प्रतिनिधी)- पाथरी मतदार संघात अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मतदार संघातील एकंदर वातावरण लक्षात घेता, चित्र बरेच स्पष्ट झाल्याचे मतदारांच्या चर्चेतून जाणवते. या मतदार संघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाथरी मतदार संघात शिवसेनेच्या मिराताई रेंगे, कॉंंग्रेस सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाबाजानी दुर्रानी, मनसेच्यावतीने माजी आ.हरिभाऊ लहाने आणि अपक्ष म्हणुन मोहन फड यांच्यासह १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्वांनीच प्रचार यंत्रणा राबविण्यास प्रारंभ केला. मात्र अवघ्या चार दिवसातच या मतदार संघातील चित्र हळूहळू स्पष्ट होण्यास सुरुवात झाली. सुरेश वरपूडकर यांनी शेवटच्या क्षणी कॉंग्रेसची उमेदवारी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांतही संभ्रमावस्था होती. कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांत यामुळे काही प्रमाणात नाराजी निर्माण झाली. पुन्हा तीच वेळ येणार काय? अशी चर्चाही कार्यकर्त्यांतून ऐकावयास मिळू लागली. मोहन फड यांनी इंद्राणी मित्र मंडळाच्या माध्यमातुन गेल्या दोन वर्षापासुन या मतदार संघात सातत्याने संपर्क ठेवला. गाव पातळीवर मित्र मंडळाची शाखा स्थापन करून युवा कार्यकर्त्यांचा संच निर्माण केला. आणि हे करीत असतांनाच त्यांच्या समस्या केवळ जाणून न घेता, त्या सोडविल्या. अनेक भागात लोकसहभागातून विकास कामे करून त्यांनी विकासशील दृष्टी असल्याचे दाखवून दिले. उन्हाळ्यात अनेक ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी मिळत नव्हते. त्यावेळेस मोहन फड यांनी पदरमोड करून अनेक गावात पाण्याची व्यवस्था केली. बोअर घेऊन ठिकठिकाणी नागरीकांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. अनेक भागात रस्त्यांची दुरुस्तीही केली. यामुळे या मतदार संघातील नागरीक मोहन फड यांच्याकडे एक वेगळ्या विचाराने पाहत आहेत. मिराताई रेंगे या विद्यमान आमदार असुन शिवसेनेच्या माध्यमातुन त्यांनी प्रचार यंत्रणा त्वरीत गतिमान केली. सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन त्या प्रचार यंत्रणा राबवितांना दिसून येतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाबाजानी दुर्रानी हे विधान परिषद सदस्य आहेत. अनेक वर्षापासुन नगर परिषदेवर त्यांचे प्राबल्य असुन त्या माध्यमातुन त्यांचे शहरावर वर्चस्व आहे. एक चांगला व्यक्ती म्हणुन सर्वत्र परिचीत असले तरी ते सध्या आमदार असल्यामुळे पुन्हा ही निवडणूक ही बाब जनतेलाच न पटणारी होऊ लागली. मात्र जवळचे पदाधिकारीही स्थितप्रज्ञ अवस्थेत होते. या मतदार संघाचा आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही. यामुळे जो विकास करू शकेल, त्याच्या मागेच जनता उभी राहिल असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे. आणि विकासाची चुनूक मोहन फड यांनी गेल्या दोन वर्षापासुन या मतदार संघात दाखवून दिली आहे. एकंदर सध्याची परिस्थीती लक्षात घेता, या मतदार संघातील जनता सर्वांनाच हो म्हणत असली तरी विकासाच्या मागे राहील अशी चर्चा मतदार संघातील जनतेत होत आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.