चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

जिल्ह्यात पदयात्रा,रॅलीद्वारे प्रचाराची सांगता

Source: Tarun Bharat Solapur      Date: 14 Oct 2014 02:18:24

परभणी, (प्रतिनिधी)- पदयात्रा, रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांच्यावतीने करण्यात आला. सोमवारी प्रचाराची सांगता करण्यात आली. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासुन जिल्ह्यातील चारही मतदार संघातील उमेदवारांनी मतदारांशी थेट संपर्क साधला. तसेच क्वॉर्नर बैठका, पदयात्रेद्वारे मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, एमआयएमचे ओवेसी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आदींच्या सभामुळे वातावरण ढवळून निघाले. चार मतदार संघात ८१ उमेदवार निवडणूक रिंगणात असुन सर्वच मतदार संघात बहुरंगी लढती होत असल्या तरी मतदारांचा कानोसा घेतला असता चित्र बरेच स्पष्ट झाल्याचे दिसून येते. जाहीर प्रचाराचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील चारही मतदार संघातील उमेदवारांनी आपल्या मतदार संघात पदयात्रा, रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. परभणी शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना, बसपा, मनसे आदींच्यावतीने प्रचार फेर्‍या काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला. जिंतूरमध्येही भाजपा उमेदवार संजय साडेगावकर यांच्यावतीने रॅली काढण्यात आली. पाथरी येथेही शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्यावतीने रॅली काढण्यात येऊन मतदारांशी जाहीर संवाद साधण्यात आला. यामुळे शहरातील वातावरण वेगळेच जाणवत होते. ढोल-ताशाच्या गजरात अनेकांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. यातुन आपल्या मागे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत हे दाखविण्याचा प्रयत्नही काही उमेदवारांनी केला. मात्र सुज्ञ मतदार काय निर्णय घेतील? यावर सर्व काही अवलंबून आहे. प्रत्येक मतदार संघातील गणित जवळपास पक्के झाले असले तरी सोमवार आणि मंगळवारची रात्र अत्यंत महत्वाची असुन मतदार कोणत्या बाजूने झुकतील? याला महत्व प्राप्त होणार आहे. जाहीर प्रचार थांबला असला तरी खर्‍या प्रचाराने वेग घेतला असुन मतदारही वेगवेळ्या अपेक्षा ठेवून असल्याचे चित्र पहावयास मिळते. अभी नही तो कभी नही म्हणत, उमेदवार व त्यांचे समर्थक कोणत्याही परिस्थीतीत मतदारांना आपलेेसे करण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात. या सर्व घडामोडीत आचारसंहितेचा कॅमेरा दुर आहे कि नाही? याची काळजी घेण्यात येत होती. परभणी शहरात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना या तिन्हीही पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या रॅली शिवाजी पुतळ्याजवळ एकत्र आल्या त्यामुळे एक वेगळेच वातावरण दिसून आले. याचा फटका वाहतुकीला बसला. जवळपास अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. या निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवाराला महत्व प्राप्त झाले असुन सर्वच उमेदवारांनी आपापले नातेवाईक, हितचिंतक, मित्र मंडळी जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मताची विभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थीती निर्माण झाल्यास कोण विजयी होईल? हे सांगणे अवघड आहे. काही मतदार संघातील कल स्पष्ट दिसून येत असुन त्यातुन काही भागातील मतदान फिरविण्यात उमेदवारांना यश आल्यास त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विधानसभा निवडणूक असतांनाही ही निवडणूक एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीसारखी जाणवत असुन मतदारांना प्रत्यक्ष भेट याला यात चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे आता दोन दिवसात घडणार्‍या घडामोडी महत्वपूर्ण असुन त्यावरच गणित आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.